अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निम्न तापी पाडळसरे धरणाच्या कामासंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या भेटीसाठी दिल्लीत असल्याने मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊ शकलो नाही, मात्र शासन आणि प्रशासनाच्या सतत संपर्कात राहून पूरग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी दिले आहे.

आमदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर मतदारसंघातील पातोंडा, नांद्री, अमळगाव, खेडी तसेच पारोळा तालुक्यातील शेळावे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त नांद्री, पातोंडा आणि अमळगाव परिसरात पूरस्थितीमुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच आपण तात्काळ प्रांताधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी आणि कृषी अधिकारी यांना मदत कार्यासाठी सूचना दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे. या परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांनाही कळवण्यात आले आहे.
नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, हे पंचनामे लवकर पूर्ण झाल्यावर शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. “शेतकरी बांधवांवर आज संकट आले असले तरी सामूहिकपणे आपण त्याचा सामना करू. शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, मी पूर्णपणे त्यांच्या सोबत आहे,” असे भावनिक आवाहनही आमदार पाटील यांनी केले.



