मुंबई (वृत्तसंस्था) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाच्या काही परवानग्या रखडल्या आहेत. परंतू येत्या दोन वर्षात म्हणजे १४ एप्रिल २०२२ पर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी इंदू मिलची पाहणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीच्या आधारे आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, पंतप्रधानांनी भूमीपूजन केल्यानंतर काम कुठेपर्यंत आले ते पाहण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्र्यांनीही माहिती घेतली आहे. या स्मारकाला भेट द्यावी असे प्रत्येकाला वाटले पाहिजे असे स्मारक बनत आहे. त्यामुळे त्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो होतो. राज्य सरकार यासाठी लागणारा सर्व खर्च करणार आहे. लवकरात लवकर हे स्मारक व्हावे यासाठी आढावा घेतला. कामात काही अडथळा येणार नाही. यावेळी त्यांना शिवस्मारकाच्या कामाबाबतही विचारणा करण्यात येईल. शिवस्मारकाचे काम माझ्याकडे नाही. त्याबाबत एजन्सी नेमली आहे. या एजन्सीसोबत चर्चा करून कामाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.