सावदा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये राजकीय वातावरण तापताना उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सुहास शालिग्राम भंगाळे यांनी आज आपली स्पष्ट आणि निर्णायक भूमिका जाहीर केली आहे. राजकारणात अधिकृत प्रवेशाची घोषणा केल्यानंतर त्यांच्या निर्णयाकडे केवळ मतदारच नव्हे तर सर्वच पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून आगामी चुनावी घडामोडींसाठी आपली अचूक रणनीती मांडली आहे.
भंगाळे यांनी स्पष्ट केले की, सावद्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचा दांडगा मित्रपरिवार आहे तसेच कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या प्रति सद्भाव आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर युती किंवा महायुती झाली, तर कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये आणि मतांचे विभाजन टळावे यासाठी ते आपली उमेदवारी दाखल करणार नाहीत. परंतु, जर कोणत्याही प्रकारची युती अथवा महायुती साधली नाही, तर ते प्रभाग क्रमांक पाचमधून अपक्ष उमेदवार म्हणून जनतेचा कौल घेण्यासाठी रिंगणात उतरतील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अलिकडच्या काळात विविध सामाजिक उपक्रम, जनहिताचे कार्यक्रम आणि शहराच्या विकासाशी निगडित उपक्रांमुळे सुहास भंगाळे यांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे. त्यांच्या उपक्रमांमुळे युवकांसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंत व्यापक पाठिंबा निर्माण झाला असून त्यांच्या उमेदवारीची शक्यता निर्माण झाल्यापासूनच प्रभाग पाचमध्ये मोठी चर्चा रंगू लागली आहे.
संतुलित, संयमी आणि राजकीय सौहार्द जपणारी भूमिका घेतल्याबद्दल भंगाळे यांच्या निर्णयाचे शहरभरात स्वागत होत आहे. पुढील काही दिवसांत स्थानिक राजकारणात कोणती समीकरणे घडतात आणि युतीच्या घडामोडी कशा आकार घेतात, याकडे सावदा शहराचे लक्ष केंद्रीत झाले आहे.



