नवी दिल्ली वृत्तसंस्था । एन.डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांच्या हत्येप्रकरणी शेखर यांची पत्नी अपूर्वा शुक्ला यांना पोलिसांनी अटक केली आहे. अपूर्वा यांच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतरच पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
युपीचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांचा मृतदेह १६ एप्रिल या दिवशी आपल्या बंगल्यातील एका खोलीत आढळून आला होता. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर पोलिसांना अनेक विसंगती आढळून आल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर अपूर्वा पहिल्या मजल्यावर जात असल्याचे पोलिसांना आढळले. घरातील मदतनीसांनी मात्र आपल्या जबाबात अपूर्वा या रात्री २.३० वाजेपर्यंत टीव्हीवर मालिका बघत असल्याचे म्हटले होते. या मुळे घरातील व्यक्तीनेच रोहित शेखर यांचा खून केल्याचा संशय बळावला होता. यातच रोहितच्या मातोश्रीने त्यांचे पत्नीसोबत वाद असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी या दिशेने चौकशी सुरू केली. यातून त्यांना अटक करण्यात आली आहे. अपूर्वा यांना रोहित यांचा जवळच्या नातेवाईक महिलेशी संबंध असल्याचा संशय होता. यातून दोन्हींमध्ये अनेकदा भांडणे होत होती. यातूनच रोहित शेखर यांची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासातून दिसून आले आहे.