दुचाकी अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर ते टाकरखेडा रस्त्यावर मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा अर्बन वेअर हाऊससमोर अचानक दुचाकीसमोर गाय आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे.

मंगलाबाई मधुकर ठाकरे (वय ५१, रा. गुरुकृपा कॉलनी, अमळनेर) असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती मधुकर नारायण ठाकरे (वय ५५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मधुकर ठाकरे हे आपली पत्नी मंगलाबाई यांच्यासोबत (दुचाकी क्र. एमएच १९ डीएन ८५१४) कुऱ्हे येथील सती माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते अमळनेरकडे परतत असताना दुपारी २ वाजेच्या सुमारास रस्त्यावरील बुलढाणा अर्बन वेअर हाऊसजवळ अचानक त्यांच्या दुचाकीसमोर गाय आडवी आली. या अनपेक्षित घटनेमुळे मधुकर ठाकरे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी थेट गाईवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकीवरून खाली पडलेल्या मंगलाबाई ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, मधुकर ठाकरे हे गंभीर जखमी झाले.

अपघात घडल्यानंतर जखमी मधुकर ठाकरे यांना तातडीने खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील हे करीत आहेत.