ढाका (वृत्तसंस्था)। पत्नीशी भांडण झाले म्हणून घर सोडून जाणारे पती अनेक असतात, पण पत्नीशी भांडणे झाले म्हणून एका पतीने ढाक्याहून दुबईला जाणारे विमानच हायजॅक केले. आश्चर्याची बाब म्हणजे विमान हायजॅक करण्यासाठी त्याने खेळण्यातले पिस्तूल वापरले. त्यासोबत त्याने केलेली मागणीची थक्क करणारी होती. महादी नावाच्या या इसमाचा नंतर सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला.
बांगलादेशच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादीचे (वय-२५) त्याच्या पत्नीशी भांडण झालं होते. पत्नीशी झालेलं भांडण सोडवण्यासाठी त्याला बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी बोलायची इच्छा होती. त्यासाठीच तो या विमान चढला. विमानाने ढाका विमानतळाहून टेक ऑफ केल्यावर अर्ध्या तासाने एकाएकी तो विमानचालकांच्या केबिनमध्ये शिरला. बंदूकीचा धाक दाखवून त्याने विमान चालकांना विमान वळवायला भाग पाडले. १३४ प्रवासी आणि १४ क्रू सदस्य असलेले हे विमान त्याने एकट्यानेच हायजॅक केले. मला शेख हसीनांशी बोलायचं आहे, अशी मागणी तो वारंवार करत होता.
थोड्यावेळाने हे विमान चितगाव विमानतळावर उतरवण्यात आले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानात शिरून त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि १३४ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गोळीबारात तो जखमी झाला होता नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्याजवळचे पिस्तूल जप्त केले. हे पिस्तूल खेळण्यातले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महादी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचंही पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे.