फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिल्यानंतर काँग्रेसच्या तमाम ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणीसाठी न्हावी गाव गाठल्याचे वृत्त आहे. दरम्यान, महाजन व त्यांचे समर्थक आपल्या निर्णयावर ठाम असून या निर्णयाला अलीकडच्या काळातील घटनांची किनार असल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ नेत्यांची न्हावी येथे धाव
याबाबत वृत्त असे की, माजी गृहराज्यमंत्री जे. टी. महाजन यांचे सुपुत्र तथा मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी शुक्रवारीच भारतीय जनता पक्षात जाण्याचे संकेत दिले. प्रसारमाध्यमांना त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरादेखील दिला. लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या माध्यमातून हे वृत्त सर्वप्रथम झळकताच सर्वत्र खळबळ उडाली. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवडणुकीच्या मनसुब्याला यामुळे जोरदार हादरा बसला आहे. यामुळे शिरीष चौधरी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे आणि अन्य ज्येष्ठ पदाधिकार्यांनी न्हावी येथे जाऊन शरद महाजन यांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली. तथापि शरद महाजन यांनी याला साफ नकार दिल्याने या नेत्यांना निराश होऊन फिरावे लागले. दरम्यान, शनिवारी दुपारीसुध्दा काँग्रेसचे नेते महाजन यांच्या निवासस्थानी गेले असून त्यांच्याशी चर्चा करत आहेत.
राजकीय गेम करण्याचा प्रयत्न
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून शिरीष चौधरी यांच्या सोबत असणार्या शरद महाजन यांनी पक्षत्यागाचा निर्णय का घेतला असावा अशी चर्चा सुरू झाला आहे. यामागील प्रमुख कारण मधुकर सहकारी साखर कारखान्यात शिरीष चौधरी व त्यांच्या समर्थकांनी शरद महाजन यांचा राजकीय गेम करण्याचा केलेला प्रयत्न हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर शरद महाजन हे स्वत: आमदारकीसाठी इच्छुक होते. त्यांनी काँग्रेसकडून तिकिटासाठी आधी प्रयत्नदेखील केले होते. तथापि, शिरीष चौधरी यांना त्यांनी नेहमीच मदत करून एक पाऊल मागे घेतले होते. यानंतर मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी शरद महाजन विराजमान झाल्यानंतर शिरीष चौधरी आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले.
कारखाना व शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य
दरम्यान आमदार हरीभाऊ जावळे यांनी विरोधात असतांनाही शेतकर्यांच्या हितासाठी शरद महाजन आणि त्यांच्या सहकार्यांना मदत केली. त्यांना पहिल्या टप्प्यातील थकहमीदेखील मिळवून दिली. यामुळेच मसाकाचा गेला हंगाम सुखरूपपणे पार पडला. अन्यथा गेल्या वर्षीच या कारखान्याला टाळे लागले असते. आमदार हरीभाऊ जावळे यांनी विरोधात असतांनाही केलेली मदत आणि पॅनलप्रमुख असणारे शिरीष चौधरी यांनी सोबत असतांनाही पाय मागे ओढल्यामुळे शरद महाजन हे कधीपासूनच अस्वस्थ होते. यातच काही दिवसांपूर्वी मसाकाच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत शिरीष चौधरी हे महाजन यांना अक्षरश: वार्यावर सोडल्याचे दिसून आले. यामुळे तेव्हाच शरद महाजन यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मसाका आणि यावर अवलंबून असणारे ऊस उत्पादक यांना पुनर्जीवन मिळण्याची शक्यता बळावली आहे. शरद महाजन यांचा भाजपमधील प्रवेश हा यावल-रावेर विधानसभा निवडणुकीला कलाटणी देणारा ठरू शकतो असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.