
मुक्ताईनगर-पंकज कपले | एकीकडे सर्वत्र नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतांना मुक्ताईनगरात अद्याप तरी समोरच्या घडामोडी काहीही दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर शेवटच्या टप्प्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत देखील यातून मिळाले आहेत.

मुक्ताईनगर नगरपंचायतीत लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी निवडणूक होत असून तूर्तास तरी पडद्याआड गतीमान घडामोडी घडत आहेत. अनेक नगरपालिकांमधील उमेदवार जाहीर झाले असून काही ठिकाणी उमेदवारांची निश्चीती झालेली आहे. मुक्ताईनगरात मात्र अद्याप तरी कोणतेही नावे समोर आलेली नाहीत.
मुक्ताईनगर शहराच्या रणांगणात यंदा देखील चंद्रकांत पाटील आणि एकनाथराव खडसे या दोन्ही पारंपरीक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत रंगणार आहे. यंदा महिला राखीव जागा असून दोन्ही मातब्बर नेते हे आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची शक्यता आहे. तथापि, आश्चर्याची बाब म्हणजे अजून तरी या दोन्ही मान्यवरांनी आपले पत्ते खुले केल्याचे दिसून येत नाही. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू असून शेवटच्या टप्प्यात उमेदवाराचे नाव जाहीर होणार असल्याचे मानले जात आहे. तर, आ. एकनाथराव खडसे यांच्या बाजूने वरकरणी कोणत्या हालचाली सुरू नसल्या तरी ते आपल्या विश्वासू सहकाऱ्यांसोबत निवडणुकीबाबत खलबते करत असल्याची माहिती समोर आली आहे.
अजून एक लक्षणीय बाब म्हणजे मुक्ताईनगरातील सामना हा शिवसेना विरूध्द शरद पवार गट असा होणार की, महायुती विरूध्द महाविकास आघाडी ? याचे देखील चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राप्त माहितीनुसार मुक्ताईनगरात शिवसेना आणि भाजप सोबतीने लढणार असल्याचे जवळपास निश्चीत झालेले असून महाविकास आघाडीसाठी घटक पक्षांची बोलणी सुरू असल्याची माहिती आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर ही असून अगदी शेवटच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर होणार असल्याची आजची विश्वसनीय माहिती आहे. यामुळे कोणताही उमेदवार हा खुलेपणाने आपली उमेदवारी निश्चीत मानून प्रचार करत नसल्याचेही दिसून येत आहे. तथापि, सोशल मीडियाच्या माध्यमातून बहुतांश उमेदवारांनी आपापली इच्छा व्यक्त केली असून प्रभागात देखील भेटीगाठी वाढविल्या आहेत.
या सर्व बाबींचा विचार करता मुक्ताईनगरमध्ये तूर्तास वरवर शांतता दिसून येत असली तरी येत्या काही दिवसात मोठा राजकीय कोलाहल पहायला मिळणार असल्याचे निश्चीत आहे. म्हणजेच आजचा ‘सन्नाटा’ हा उद्याच्या वादळाची नांदी असल्याचे आपल्याला मानता येणार आहे.



