मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय हेतूने कारवाई होत असताना ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणणारे भाजपा नेते किरिट सोमय्या, प्रविण दरेकर त्यांच्यावरील कारवाईवेळी कशाला घाबरत आहेत? त्यांनीही चौकशीला सामोरे जावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतिल लोंढे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या ‘विक्रांत बचाव’ निधी प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे. सोमय्या पिता पुत्र दोघांनाही पोलिसांनी चौकशीला बोलावले असता ते चौकशीला गेले नाहीत. दररोज विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करणारे सोमय्या स्वतःवर कारवाईची वेळ आली की गायब झाले, दोन दिवसांपासून ते ‘नॉट रिचेबल’ आहेत. ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली सोमय्या यांनी देशभावनेशी खेळ केला आहे. निरव मोदी, विजय माल्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच ते पळून गेले तसेच सोमय्याही पळाले आहेत का?, पळून जाण्यापेक्षा त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे.
भाजपाचे दुसरे नेते, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मुंबई बँकेतील घोटाळ्याप्रकणी रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु आहे. चौकशीवेळी समर्थकांची गर्दी जमवून पोलीस स्टेशनबाहेर ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या गेल्या. ‘वंदे मातरम’ हे पवित्र शब्द आहेत. स्वातंत्र्यचळवळीत अनेक क्रांतीवीर व स्वातंत्र्यसैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले. या पवित्र शब्दांचा वापर भाजपा आरोपींना वाचवण्यासाठी करत आहे हे दुर्दैवी तसेच तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, कायद्याच्या चौकटीत जे होईल त्याला सामोरे जावे, दोषी असतील तर त्यांना शिक्षाही होईल. त्यासाठी दबाव आणणे, चौकशीपासून पळ काढणे हे कशासाठी? असे प्रश्न लोंढे यांनी उपस्थित केले आहेत.