मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातून विविध प्रकल्प गुजरातला जात असल्याने विरोधक आक्रमक झालेले असतांना आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
एकामागून एक प्रकल्प गुजरातमध्ये जात असतांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला, गुजरातमध्ये गेला. माझी मागची सर्व भाषणे तुम्ही जर काढून बघितली तर पहिल्यापासून माझं मत हे असंच होतं की, पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान असलं पाहिजे. उद्या जर महराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता असं समजा की आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतय की जो प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय. याशिवाय मला असं वाटतं पंतप्रधानांनी स्वत: याकडे लक्ष देणं गरेजंच आहे, की प्रत्येक गोष्ट ही जर गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे?. मला वाटतं पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो सगळ्या देशाचा असला पाहिजे.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, आजही महाराष्ट्र राज्य उद्योग-धंद्यांच्याबाबतीत हे इतर कोणत्याही राज्यापेक्षा पुढे आहे. उद्योग-धंद्यांच्याबाबतीत महाराष्ट्र नेहमीच प्रगतीपथावर राहिलेला आहे. उद्योगपतींनाही महाराष्ट्र हेच राज्य त्यांचं प्रथम क्रमांकाचं वाटत आलेलं आहे. त्यामुळे असं नाही की गुजरातमध्ये फार चांगल्या सुविधा आहेत आणि महाराष्ट्रात कमी सुविधा आहेत. मला असं वाटतं की या गोष्टीकडे राजकीय न पाहता, देशाचा विकास म्हणून प्रत्येक राज्य मोठं करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे.