मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या ईडीच्या नोटीशीबाबत मीच अनभिज्ञ आहे. तसेच चूक नसल्यास त्यांनी घाबरण्याची काय गरज? अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून, त्यांना येत्या २२ तारखेला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यावरून मनसेसह राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. ईव्हीएमविरोधी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन राज यांनी केल्याने सूडबुद्धीने ही नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, राज यांना ईडीने नोटीस पाठवली आहे हे मी माध्यमातून ऐकले आहे. त्याबाबत मला काहीच माहीत नाही, असे ते म्हणाले.