मुंबई, वृत्तसंस्था | सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांना उत्तर देताना यापूर्वी शिवसेनेची प्रतिक्रिया जहाल असायची. आता मात्र, त्यांच्या भुमिकेत बदल झाला असून आजची त्यांची प्रतिक्रिया अत्यंत मवाळ होती, अशा शब्दांत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेला फडणवीस यांनी डिवचले आहे.
शिवसेनेने कधी नव्हे इतके सौम्य धोरण आता स्वीकारले आहे. राहुल गांधी यांनी आज वीर सावरकर यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य तर अतिशय बेजबाबदारपणाचे आहे.
फडणवीस म्हणाले, “सत्तेसाठी शिवसेनेला कुठल्या लोकांसोबत तडजोड करावी लागत आहे हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. सावरकरांचा अपमान महाराष्ट्र आणि देश कधीही सहन करणार नाही. यापूर्वी सावरकरांविरोधातील विधानांवर शिवसेनेची प्रतिक्रिया कशी जहाल आणि जळजळीत असायची आता मात्र, आता आता ती का नरम पडलीय? हा माझ्या समोर प्रश्न आहे. आज आलेली शिवसेनेची प्रतिक्रिया किती मवाळ आहे. यापूर्वीच्या शिवसेनेच्या प्रतिक्रिया आपण बिघतलेल्या आहेत. सत्तेसाठी शिवसेनेच्या भुमिकेत बदल झाला आहे त्यामुळे त्यांना त्यांची सत्ता लखलाभ.”
“राहुल गांधी यांनी केलेलं विधान हे अत्यंत लाजिरवाणे आहे. सावकरांबाबत कदाचित त्यांना माहिती नाही. दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा होणे, हे भारताच्या इतिहासात एकाच क्रांतिकारकाबाबत घडलेय आणि ते नाव म्हणजे स्वातंत्रवीर सावरकर. १२ वर्षे अंदमानाच्या काळ्या कोठडीत सावरकरांनी ज्या प्रकारचे अनन्वित अत्याचार सहन केले आहेत, ते कदाचित देशाच्या इतिहासात कोणीही सहन केलेले नसेल,” असेही फडणवीस म्हणाले.
“राहुल गांधी १२ तासही अशा प्रकारे काळ्या कोठडीत राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना सावरकरांबाबत बोलण्याचा अधिकार नाही. केवळ आपल्या नावापुढे कोणी गांधी आडनाव लावले म्हणून कोणी गांधी होत नाही. मला वाटते हे खूपच चुकीच्या पद्धतीचे विधान आहे, आम्ही याची निंदा करतो,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.