मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेवर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत महाराष्ट्रात काही झालं की स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? असा सवाल विचारला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडना घडल्यानंतर सध्या देशभरात सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. यावेळी राज ठाकरेंनी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून का अडवलं जात आहे, नक्की कशाची भीती सरकारला वाटत आहे असा प्रश्न विचारला आहे.
बरं, समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे? महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत. त्यांना का जाब विचारला जात नाहीये?
हाथरस मधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे असे ठाकरे म्हणाले.