देवकर लोकसभा मग विधानसभेला कोण?

जळगाव (प्रतिनिधी) सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना फोन करत लोकसभा तुम्हालाच लढवायचीय, असा आदेश दिला. त्यानुसार मंगळवार सकाळपासूनच देवकर यांनी बैठकांवर बैठकांवर घेत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. एवढेच काय तर तरसोद येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात जात प्रातिनिधिक स्वरुपात प्रचाराचे नारळ देखील फोडले. परंतु देवकर लोकसभा लढवताय तर मग जळगाव ग्रामीण मधून राष्ट्रवादीकडून विधानसभेचा उमेदवार कोण असेल? यावर आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे.

 

विशाल देवकर विधानसभा लढवणार?

शिवसेना-भाजपने ज्या पद्धतीने घाई-घाईत युती केली, ते बघता लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील असाच अंदाज आहे. सध्याच्या घडीला राजकीय वारा देखील दोन्ही निवडणुका एकत्र होतील अशाच पद्धतीने वाहतोय. त्यामुळे देवकर लोकसभा लढवताय तर विधानसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल? याबाबत आता पासूनच चर्चा रंगायला लागली आहे. जळगाव ग्रामीणमधील सोशल मीडियातील अनेक ग्रुपवर तर देवकर यांचे सुपुत्र विशाल देवकर हेच भावी आमदार असतील, अशा आशयाचे संदेश त्यांचे समर्थक टाकताय. परंतु लोकसभा-विधानसभा एकत्र झाल्यास एकाच घरातील दोन जण कशी उमेदवारी करतील? हा मोठा प्रश्न आहे.

 

…तर देवकर पुन्हा विधानसभा लढणार

लोकसभेनंतर विधानसभा होणार असेल तर मग देवकर यांचे गणित थोडे वेगळे असू शकते. लोकसभेत यश मिळाले तर आपसूकच विधानसभेसाठी त्यांचा दावा अधिकचा पक्का होईल. अशाच स्थितीत ते आपल्याच घरातील उमेदवार म्हणजेच विशाल देवकर यांचे नाव पुढे करतील. परंतु लोकसभेत अपयश आले तर मात्र, देवकर स्वत: विधानसभा लढवतील. एकंदरीत आजच्या घडीला गुलाबराव पाटील यांच्यासारख्या तगड्या नेत्यासमोर राष्ट्रवादीकडे देवकर परिवारातील सदस्याशिवाय सध्या तरी अन्य सक्षम उमेदवार नाहीय. त्यामुळे लोकसभा-विधानसभा एकत्र झाली तर,मात्र जळगाव ग्रामीणमधून दुसरा तगडा उमेदवार राष्ट्रवादीला शोधावा लागेल.

 

पिता-पुत्र एकत्र लढण्याची शक्यता कमीच

लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र झाली तर,जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्या सारख्या तगड्या नेत्याला लढत देऊ शकेल,असा एकही उमेदवार राष्ट्रवादीकडे नाहीय. ना.पाटील यांचे भाषण आणि पक्ष संघटनला फक्त देवकर फाईट देऊ शकतात. राष्ट्रवादीला दुसरा तगडा उमेदवार न मिळाल्यास दोघं पिता-पुत्र एकत्र निवडणूक लढवू शकतात.परंतु याची शक्यता तशी कमीच आहे. कारण दोघं जण निवडणुकीच्या रिंगणात अडकल्यास बाकीची कामे कोण सांभाळणार? असा प्रश्न देवकर परीवारासमोर उपस्थित राहू शकतो. त्यामुळे जळगाव ग्रामीणमधून विधानसभेचा उमेदवार कोण असेल? आगामी काही दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होईलच.

Add Comment

Protected Content