Home राजकीय मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत भाजपचा पहिला उमेदवार ठरला? दहिसरमधून तेजस्वी घोसाळकरांचे नाव चर्चेत

मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत भाजपचा पहिला उमेदवार ठरला? दहिसरमधून तेजस्वी घोसाळकरांचे नाव चर्चेत


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महायुती आणि ठाकरे बंधूंकडून कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमधील इच्छूक उमेदवार अंतिम यादी आणि एबी फॉर्मकडे डोळे लावून बसले आहेत. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाले असले, तरी भाजपने अद्याप एकाही उमेदवाराचे अधिकृत नाव जाहीर केलेले नाही.

अशा स्थितीत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे भाजपच्या मुंबईतील पहिल्या संभाव्य उमेदवाराचे नाव समोर आल्याची चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ दहिसर परिसरातील असून, महिलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या कार्यक्रमातला आहे.

या कार्यक्रमात एका महिलेला ‘आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांना निवडून द्यायचे आहे,’ असे म्हणताना ऐकू येते आणि त्यावर उपस्थितांकडून टाळ्यांचा जोरदार कडकडाट होतो. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शेअर करताना तेजस्वी घोसाळकर यांनी ‘दहिसर प्रभाग क्रमांक 2’ असा उल्लेख केला आहे. या विश्वासाने आणि पाठिंब्याने अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे सांगत, दहिसरच्या न्याय आणि प्रगतीसाठीच्या आपल्या निर्धाराला मैत्रिणी, बहिणी आणि माता-भगिनींचे बळ मिळत असल्याची भावना त्यांनी कॅप्शनमध्ये व्यक्त केली आहे.

या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात तेजस्वी घोसाळकर या दहिसर प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. भाजपकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, या पोस्टमुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू आहे.

तेजस्वी घोसाळकर यांचे कुटुंबीय राजकीयदृष्ट्या परिचित आहे. त्यांचे सासरे विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षे विनोद घोसाळकर आणि त्यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेत सक्रिय होते. अभिषेक घोसाळकर हे माजी नगरसेवक असून मुंबई बँकेचे संचालकही होते. 2024 मध्ये अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नावाच्या व्यक्तीने हत्या केल्याची घटना राज्यभर गाजली होती.

दरम्यान, 2017 साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून विजयी झाल्या होत्या. त्यांनी अनेक वर्षांची ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांनी दहिसरमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये जोरदार संपर्क मोहीम सुरू केली असून, स्थानिक पातळीवर त्यांची उपस्थिती ठळकपणे जाणवत आहे.

एकंदरीत पाहता, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ आणि स्थानिक हालचाली पाहता तेजस्वी घोसाळकर या भाजपच्या मुंबईतील पहिल्या उमेदवारांपैकी एक असतील, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. येत्या काही दिवसांत भाजपकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound