Home धर्म-समाज गाई व पतिव्रतेचे अश्रू पडले की धर्मरक्षणासाठी देव अवतार घेतात : समाधान...

गाई व पतिव्रतेचे अश्रू पडले की धर्मरक्षणासाठी देव अवतार घेतात : समाधान महाराज


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरतीवर जेव्हा-जेव्हा अन्याय आणि अत्याचार वाढतात, तसेच गाई व पतिव्रता स्त्रियांचे अश्रू पृथ्वीवर पडतात, तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतात, असे प्रतिपादन हरिभक्त परायण समाधान महाराज भोजेकर यांनी केले. यावल येथे आयोजित श्रीराम जन्मोत्सव व कथामालेच्या तिसऱ्या दिवशी ते प्रवचनातून बोलत होते.

महाराज म्हणाले की, रावण हा मूळचा ब्राह्मण कुळातील राजा होता. मात्र आपल्या कुकर्मांमुळे तो असुर बनला. त्याच्या अत्याचारांचा अंत करण्यासाठी भगवान श्रीरामांनी अवतार घेतला. श्रीरामांचा जन्म सूर्यवंशी कुळातील ६४ व्या रघुकुलात झाला असून त्या कुळातील सर्व राजे धर्मनिष्ठ व सत्कर्मी होते. त्यामुळेच त्या पवित्र कुळात भगवान श्रीरामांचा जन्म झाला.

याच परंपरेत सत्यासाठी जगणारे राजा हरिश्चंद्र यांचे उदाहरण देताना महाराजांनी सांगितले की, स्वप्नात दिलेल्या वचनाचेही त्यांनी पालन केले. तसेच श्रावण बाळ हा आई-वडिलांची सेवा करणारा आदर्श पुत्र होता. आजच्या पिढीने त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याची गरज आहे.

सध्याच्या काळात काही मुले आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत असल्याचे वास्तव दु:खद असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र शेतकरी वर्गात अजूनही आई-वडिलांची शेवटपर्यंत सेवा करणारी मुले आढळतात. ते आपल्या पालकांना जसे आहे तसे स्वीकारतात आणि प्रेमाने सांभाळतात. म्हणून खरा मुलगा आणि खरा कर्तव्यदक्ष माणूस शेतकरीच असल्याचे त्यांनी सांगितले.

“बाप आहे तर सर्व काही आहे. ज्याला बाप नसतो त्याला बापाचे महत्त्व समजते, पण काहींना बाप असतानाही त्याची किंमत कळत नाही,” असे सांगत त्यांनी कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले.

सज्जनांची देव कसोटी घेतो, तर दुर्जनांची घेत नाही. जसे सोन्याला कस लावला जातो, तसे सज्जनांना संकटांची परीक्षा द्यावी लागते, असेही समाधान महाराजांनी उपस्थित श्रोत्यांना सांगितले.

दरम्यान, श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम मेणबत्त्यांच्या प्रकाशात उत्साहात साजरा करण्यात आला. या कथामालेसाठी गावातील नागरिक, मित्रमंडळ आणि आयोजक समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे.


Protected Content

Play sound