जुने घर विकत घेताना तपासा वीजबिल अन्यथा थकबाकी वसूल होणार !

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एखाद्या घराची, जागेची मालकी बदलली तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार वीजवितरण कंपन्यांना असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळेच जुनी जागा, फ्लॅट, घर घेताना सावध रहा. त्याचे वीजबिल तपासा.
कारण, पूर्वीच्या मालकाने थकविलेले वीजबिल नंतरच्या नवीन मालकाकडून वसूल करण्याचे आदेश महावितरणने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, ज्या कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित (पी.डी.) ग्राहकांकडे वीजबिलाची थकबाकी आहे, त्यांना महावितरण अभय योजनेत व्याज व दंड माफ करून वीजबिल भरण्याची संधी देण्यात आली आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू असलेल्या या योजनेचा लाभ घेऊन संबंधितांनी बिले भरावी आणि पुढील कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
एखाद्या जागेचे वीजबिल थकित असेल आणि जागेचा विक्री व्यवहार झाला असेल, तर नवीन मालक वीजजोडणीसाठी नव्याने अर्ज करतात. त्यामुळे त्या जागेवरील पूर्वीच्या बिलाची थकबाकी प्रलंबित राहून वीजवितरण कंपन्यांचे नुकसान होते. त्यामुळे जागेच्या वीजबिलाची थकबाकी वसूल केल्याशिवाय नवीन वीजजोडणी देण्यास नकार देण्याचे अधिकार वीजवितरण कंपन्यांना आहेत. त्याविरोधात वीजबिलाची थकबाकी असलेली जागा खरेदी केलेल्या नव्या मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
महाराष्ट्रासह काही राज्यांतून अशा प्रकारची १९ प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना, जागेची मालकी बदलली तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबाकीची वसूली करण्याचा अधिकार वीज कंपन्यांना असल्याचे स्पष्ट केले आहे. महावितरणच्या अकोला परिमंडलात ३१ मार्च २०२४ पर्यंत वीजबिलांच्या थकबाकीमुळे लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील  २ लाख २६ हजार ५२८ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.
या ग्राहकांकडे २४२ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ६४ हजार ६४० ग्राहकांकडे ८१ कोटी ७५ लाख,बुलडाणा ०१ लाख ३ हजार २७७ ग्राहक १०१ कोटी ३१ लाख आणि वाशीम जिल्ह्यातील ५८ हजार ६११ ग्राहकांकडे ५९ कोटी २८ लाख रूपये थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी या ग्राहकांची पडताळणी करण्याची मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत एखाद्या जागेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने थकविलेल्या वीजबिलाची थकबाकी नंतरच्या नवीन मालक किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

Protected Content