Home राजकीय निकालानंतर राज ठाकरेंची पहिली स्पष्ट प्रतिक्रिया 

निकालानंतर राज ठाकरेंची पहिली स्पष्ट प्रतिक्रिया 


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असून, भाजप आणि शिंदे गटाने बहुतेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळू शकले नसल्याने मनसेच्या वाटचालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया देत, पराभव स्वीकारत आत्मपरीक्षण आणि पक्ष नव्याने उभारण्याचे स्पष्ट आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले असून, बहुतांश ठिकाणी भाजपचे वर्चस्व दिसून आले. विशेषतः प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या निवडणुकीत भाजपला ८९, तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या असून, त्यांचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागा मिळाल्या, तर राज ठाकरेंच्या मनसेला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले असून दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मुंबईबरोबरच इतर महापालिकांमध्येही मनसेची कामगिरी मर्यादित राहिली आहे.

विशेष बाब म्हणजे, तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येत बीएमसी निवडणुकीत युतीच्या माध्यमातून लढले. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने या युतीच्या परिणामकारकतेवरही चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पण ठाम शब्दांत भूमिका मांडली आहे.

आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ही लढाई केवळ निवडणुकांची नसून मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची आहे. अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या ताकदीसमोर शिवशक्तीची ही लढाई सोपी नव्हती, तरीही मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या झुंजीचे त्यांनी कौतुक केले. अपेक्षित यश मिळाले नसले तरी खचून न जाता पुढील संघर्षासाठी सज्ज राहण्याचा संदेश त्यांनी दिला.

निवडून आलेले मनसेचे नगरसेवक स्थानिक पातळीवर सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही घडल्यास त्याला ठामपणे विरोध करतील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला. काय चुकले, काय कमी पडले आणि पुढे काय करावे लागेल, याचे सखोल विश्लेषण सर्वांनी एकत्र बसून केले जाईल, असे सांगत त्यांनी आत्मपरीक्षणावर भर दिला.

सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले मराठी माणसाला डावलण्याची एकही संधी सोडणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभे राहणे हेच पक्षाचे खरे कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. निवडणुका येतील-जातील, पण आपला श्वास मराठी आहे हे विसरायचे नाही, असा भावनिक संदेश देत राज ठाकरे यांनी लवकरच पुन्हा कामाला लागून पक्ष आणि संघटना नव्याने उभारण्याची हाक दिली आहे.


Protected Content

Play sound