जळगाव (प्रतिनिधी) भाजप पक्षश्रेष्ठींनी शुक्रवारी मध्यरात्री अपेक्षेप्रमाणे सलग दोन वेळेस निवडून आलेले विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे जळगाव लोकसभा मतदारसंघातून तिकीट कापत आमदार स्मिताताई वाघ यांना उमेदवारी घोषित केली. परंतु उमेदवारी घोषित करतांना भाजप पक्षश्रेष्ठींनी विद्यमान खासदाराचे तिकीट कापायचे कुठलेही कारण मात्र,सांगितले नाहीय. त्यामुळे भाजप,संघाच्या अहवालात अव्वल असून देखील एटीनानांचे तिकीट कापायचे कारण काय ? या प्रश्नांचे उत्तर पक्षश्रेष्ठीला द्यावेच लागणार आहे. दुसरीकडे एटीनाना यांना पुन्हा उमेदवारी का मिळाली नाही? या प्रश्नाचे मतदारांना काय उत्तर द्यायचे, हा एक मोठा प्रश्न आजच्या घडीला भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर आहे. तर विरोधक देखील हा एकच प्रश्न विचारून भाजपच्या नाकीनऊ आणेल, हे देखील तेवढेच खरे आहे.
जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचे नाव पहिल्या यादीत घोषित करण्यात आले नव्हते. तेव्हाच त्यांचे तिकीट कापले गेल्यावर शिक्कामोर्तब झाले होते. काही कथित फोटोंवरून पक्षातीलच काही मंडळीने ए.टी.पाटील यांना उमेदवारी देऊ नये,अशी भूमिका घेतल्याची चर्चा होती. परंतु एटीनानांविरुद्ध कोणत्याही महिलेने आरोप केले नव्हते किंवा पोलिसात तक्रार नव्हती. त्यामुळे फोटोंच्या विषयाला विनाकारण मोठे करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे भाजप व संघाने केलेल्या सर्वेक्षणात ए.टी.पाटील हे अव्वल आले होते. एकंदरीत सकारात्मक अहवाल असतांना देखील मग ए.टी.पाटील यांचे तिकीट कापण्यामागे मोठे राजकारण असेल, हे उघड आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात विविध विकास कामे झाल्याचा दावा भाजपकडून केला जाईल. परंतु विकासकामे झाले तरी मग ए.टी.पाटील यांचे तिकीट का कापले? हे मतदारांना कसे समजावून सांगतील? हा मोठा प्रश्न आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणाऱ्यांपैकी ए.टी.पाटील यांचे तिकीट का कापले? याचे कारण सांगताना भाजपला नाकीनऊ येण्याची शक्यता आता वाढली आहे. दुसरीकडे ए.टी.पाटील यांची उमेदवारी कापून एकप्रकारे ए.टी.पाटील यांच्यावरील आरोपांना मान्यता दिल्यासाखी स्थिती निर्माण झालीय.ए.टी.पाटील हे सलग दोन वेळेस निवडून आलेले आहेत. त्यामुळे मतदार संघात नाही म्हटले तरी त्यांची वैयक्तिक असेलली पकड नाकारता येणार नाही. त्यामुळे भाजपला आता मोठे ‘डॅमेज कंट्रोल’ करावे लागणार आहे. कारण मराठा समाजातील व्यक्ती तिसऱ्यांदा निवडून मंत्री बनू नये,म्हणून खा.ए.टी.पाटील यांची उमेदवारी कापल्याचा प्रचार त्यांच्या समर्थकांकडून सुरुवाती पासून होतोय. दरम्यान, एटीनानांचे तिकीट कापायचे कारण काय ? या एका प्रश्नावर विरोधक भाजपला भंडावून सोडतील यात शंका नाहीय.