मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीमधील जामिया विद्यापीठात जे काही झाले ते जालियनवाला बागची आठवण करुन देणारे आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात सध्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. केंद्र सरकारने ही आंदोलने चिरडण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यावरून उद्धव यांनी सरकारवर टीका केली. देशातील तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. युवाशक्तीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत हा तरुणांचा देश असून त्यांची शक्ती एखाद्या बॉम्बसारखी आहे. त्या बॉम्बची वात पेटवू नका. ज्या राज्यात देशात तरुण बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. म्हणून मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही तरुणांना बिथरवू नका, असा इशारा उद्धव यांनी दिला.