जळगाव, प्रतिनिधी | एकेकाळी कट्टर विरोधक असलेले आम्ही तिघेजण म्हणजे मी, जानकीराम पाटील आणि लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर आम्ही एकत्र का आलो ? कुणामुळे आलो ? एकाच व्यक्तीच्या खोटारडे पणामुळे आम्ही एकत्र आलोय, आमचं असं काय चुकलं म्हणून आम्हाला यांनी दूर केलं ? असा सवाल आज (दि.१६) सायंकाळी जळकेकर महाराज यांनी केला. ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ ममुराबाद येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, गुलाबराव पाटील आम्हाला गद्दार म्हणतात, मी मान्य करतो की, आम्ही गद्दार आहोत. पण आधी तुम्ही किती प्रामाणिक आहात ते तर सांगा. हे आम्हाला माकडं म्हणतात पण हेच माकडं आता त्यांची लंका पेटवणार आहेत.
सभेत पी.सी. पाटील म्हणाले की, गेल्यावेळी आम्ही गुलाबरावांच्या विरुद्ध निवडणूक लढलो पण एकजूट नव्हती म्हणून मत विभाजन होवून ते जिंकले होते. म्हणून यावेळी आम्ही विशाल देवकर आणि लक्ष्मण पाटील यांना माघार घ्यायला लावून अत्तरदे यांची उमेदवारी भक्कम केली आहे.
यावेळी जानकीराम पाटील म्हणाले की, गुलाबराव पाटील यांनी मतदारांना खोटी आश्वासने दिली. आता म्हणतात की, सूतगिरणी काढायची आहे. पण आता जी जिनिंग-प्रेसिंग मिल काढली होती, तिच्यात किती लोकांना नोकरी दिली ? शाळा काढली तिथे डोक्यापेक्षा वर गवत वाढले आहे.
सुभाष पाटील म्हणाले की, विकासकामे न केल्याने गुलाबराव पाटलांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांना आधी वाटत होते की, माझ्याविरुद्ध कुणीच उभे राहणार नाही, राहिले तरी टिकणार नाही, पण अत्तरदे मैदानात उतरले आणि ठाम राहिले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा म्हणाले की, सहकार मंत्री असून गुलाबरावांनी मतदार संघात कुणालाही रोजगार दिला नाही, केवळ स्वत:चे बिअर बार काढले, त्याऐवजी दोन सूतगिरण्या जरी काढल्या असत्या तर आज त्यांना मतदार संघात मत मागायला जाण्याची गरज पडली नसती.
यासभेत अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे, त्यांच्या पत्नी जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे हे ही व्यासपीठावर उपस्थित होते. सभेला ग्रामस्थांची मोठी गर्दी होती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/911855022528899/