एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कासोदा येथील रामनगर भागात एका निवृत्त सोनाराचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७० हजार रुपयांची रोकड, असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमणलाल नथू सोनार (वय ६९, रा. रामनगर, कासोदा) हे १५ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी मुलाकडे नवसारी (गुजरात) येथे गेले होते. त्यांचे घर पाच दिवस बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १० ग्रॅम सोन्याची मंगलपोत (किंमत ७० हजार), देवघरातील १०० ग्रॅम चांदीचे देव (किंमत २५ हजार) आणि ७० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

रमणलाल सोनार हे २१ जानेवारी रोजी दुपारी घरी परतले असता, त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राकेश खोडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



