यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगर परिषदेमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या निरीक्षक पदावर नुकतीच जयश्री पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला. जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी पाटील यांची भेट घेत स्वागत केले आणि शहरातील पाणीपुरवठा व स्वच्छतेसंबंधीच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली. या नव्या नियुक्तीमुळे यावलमधील नागरी समस्यांवर काही ठोस उपाययोजना राबवली जाण्याची आशा निर्माण झाली आहे.

तत्कालीन पाणीपुरवठा निरीक्षक सत्यम पाटील यांची वादग्रस्त कारकीर्द व बदलीनंतर रिक्त झालेल्या पदावर साक्री (धुळे) येथून जयश्री पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पाटील यांच्याकडे आता पाणीपुरवठा विभागासोबतच प्रभारी आरोग्य विभागाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावल शहरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा आणि वारंवार होणाऱ्या जलवाहिनी दुरुस्त्यांमुळे होणारा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने हा मुद्दा उचलून धरत नव्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी नितीन सोनार यांनी यावलमधील विविध प्रलंबित प्रश्नांवर माहिती दिली. विशेषतः पाणीपुरवठा व्यवस्था, जलवाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली होणारा आर्थिक गोंधळ, तसेच शहरातील सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रश्नावर भर देत चर्चा झाली. नागरिकांच्या तक्रारी, तांत्रिक अडचणी आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यावर उपाय शोधण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
जयश्री पाटील यांनी भेटीदरम्यान आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. जनहिताचे कोणतेही मुद्दे दुर्लक्षित केला जाणार नाही आणि आवश्यक त्या सुधारणा राबवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने केलेल्या स्वागतामुळे प्रशासन व जनतेमध्ये एक सकारात्मक संवाद सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.



