मुंबई प्रतिनिधी | कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हा तीव्र गतीने पसरत असतांना याच्यापासून बचाव करण्यासाठी डबल मास्क उपयुक्त असल्याचा दावा एका आरोग्य तज्ज्ञाने केला आहे.
जगभरात कोरोनाची रूग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. आपल्या कडे सुध्दा पेशंट वाढले असून यात कोरोनाच्या ओमायक्रॉनचा संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे अधोरेखीत झालेला आहे. ओमायक्रोनच्या संकटात डबल मास्क लावणे हाच रामबाण उपाय ठरणार आहे. कोरोनासारख्या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एकावर एक असे दोन मास्क लावण्याचा सल्ला डॉ. डेव्हीड हुई या तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रोन व्हेरिएंट हा घातक नसला तरी त्याच्या प्रसाराचा वेग डेल्टापेक्षा अनेक पट आहे. हॉंगकॉंगच्या चिनी विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड हुई यांनी मास्कवर संशोधन केले. त्यांनी सर्जिकल मास्कवर कापडाचा मास्क परिधान करून ओमायक्रोनच्या संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो असा निष्कर्ष नोंदवला आहे. सर्जिकल मास्क थोडा सैल असतो. त्यामुळे त्यावर कापडाचा मास्क घातला तर विषाणू श्वसनमार्गापर्यंत पोहोचणे कठीण होते असे त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणारी मंडळी, कंटेनमेंट झोनमधील रहिवासी, अन्य आजार असलेल्या व्यक्ती, लस न घेतलेल्या व्यक्ती, विमानतळ कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी यांनी दोन मास्क वापरणे आवश्यक असल्याचे मत देखील डॉ. हुई यांनी व्यक्त केले आहे.