जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जळगाव शहराच्या विकासाबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडत मूलभूत सुविधा सुधारणा हाच आपला प्रथम अजेंडा असल्याचे ठामपणे सांगितले. अडीच वर्षांनंतर स्थापन झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नागरिकांच्या अपेक्षा प्रचंड असून, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्राधान्यक्रम ठरवून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका शुचिता हाडा आदी उपस्थित होते.
महापौर काळे म्हणाल्या की, निवडणूक काळात नागरिकांमध्ये मोठा उद्रेक पाहायला मिळाला असून शहरातील अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत शहरातील मूलभूत सुविधांचे तीन तेरा वाजले असल्याचे वास्तव असून, त्या योजना पुन्हा सुरळीत मार्गावर आणण्याचे काम येत्या काळात हाती घेतले जाईल. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था यासारख्या नागरिकांच्या दैनंदिन गरजांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शहरातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करत, ही सर्व अपूर्ण कामे पूर्णत्वास नेण्याचा निर्धार महापौरांनी व्यक्त केला. विशेषतः मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबी आणि हॉकर्स झोनचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांना आवाहन करताना, आपला सत्कार करण्यासाठी शाल, श्रीफळ किंवा पुष्पगुच्छ घेऊन कोणीही येऊ नये तसेच कोणत्याही सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करू नये, अशी विनंती केली. जळगावकरांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण हाच आपला खरा सत्कार असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगावशी आपले भावनिक नाते अधोरेखित करत महापौर म्हणाल्या की, आपले माहेर आणि सासर दोन्ही जळगावमध्येच असल्याने येथील समस्या आणि नागरिकांच्या अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचे सहकार्य आणि नगरसेवकांची टीमवर्क अत्यावश्यक असल्याचे सांगत, सर्वांच्या सहकार्यानेच जळगावचा अपेक्षित विकास साधता येईल, असे मत महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केले.



