पणजी | गोव्यातील दलबदलू राजकारण्यांना टोला लगावत आम्ही शिवसेनेत निर्लज्जांना घेत नसल्याचे प्रतिपादन पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत गोव्यातील निवडणुकीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. यावेळी खासदार राहुल शेवाळेही उपस्थित होते. ते म्हणाले की, आमच्याकडे निर्लज्ज येत नाही. निर्लज्जांना शक्यतो आम्ही घेत नाही. निर्लज्ज राजकारणी म्हणालो. एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसर्या पक्षात जायचं हे सध्या गोव्यात सुरू आहे. त्यामुळे मी हे म्हणत आहे. गोव्याला एक परंपरा आहे. गोव्यात अनेक चांगले राजकारणी झाले. पण अलिकडे गोव्याचं राजकारण निर्लज्जतेच्या पातळीवर गेलं आहे, असं राऊत म्हणाले.
आज एका तिकिटावर निवडून यायचं आणि लगेच निर्लज्जपणे दुसर्या पक्षात सत्तेसाठी उडी मारायची. हे कुठे तरी गोव्याच्या जनतेलाच थांबवावं लागेल. हे कशा पद्धतीने थांबवायचं याची योजना शिवसेनेकडे आहे. गोव्यात वारंवार पक्षांतर करणं किती काळ चालणार?, असा सवाल त्यांनी केला. तर गोव्यात शिवसेना म्हणून २२ ते २५ जागा लढणार आहोत. मजबूत सरकार हवं असेल तर गोव्याची जनता शिवसेनेला मतदान करेल. शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत निवडून पाठवतील. गोव्यात चांगलं सुशासन द्यावं ही आमची भूमिका आहे, असं त्यांनी सांगितले. आम्हाला गोव्यात विरोधी पक्षात बसावं लागलं तरी चालेल, पण आम्ही लढणारच, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.