मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या सदस्यांनी आम्हाला संपर्क केला असून इतर अपात्र होतील अथवा पुन्हा निवडणुकीत पराभूत होतील असे भाकीत करून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे एकत्र होते आणि पुढेही राहणार असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. ते आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादीने घेतला होता. आम्हाला सुमारे १६९ सदस्यांचा पाठींबा असून अजून काही आमदारांशी संपर्क सुरू होता. मात्र आज सकाळी अजित पवार यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून ही बाब पक्षाच्या निर्णयाच्या विरूध्द आहे. त्यांच्यासोबत काही आमदार असल्याचे वृत्त असून जे त्यांच्यासोबत गेले वा जाणार असतील त्यांना पक्षांतर बंदीच्या कायद्यातील तरतुदीनुसार ते अपात्र होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रामाणिक कार्यकर्ता हा भाजपसोबत जाणार नाही. यातील आमदारांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही संबंधीतांना पराभूत करण्यासाठी एकत्रीतपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आमच्या माहितीनुसार दहा ते अकरा सदस्य अजित पवार यांच्यासोबत आहेत. हा सर्व प्रकार घडल्यानंतर यातील काही जणांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यात सहभागी असणारे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थितांना माहिती दिली.
डॉ. राजेंद्र शिंगणे हे राजभवनात होते. मात्र शपथविधी झाल्यानंतर ते थेट माझ्या घरी आले. दरम्यान, डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काल रात्री अजित पवार यांचा आपल्याला फोन आला. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर महत्वाच्या विषयावर बोलण्याचे सांगितले. याप्रसंगी आठ-दहा आमदार उपस्थित होते. यानंतर चर्चा करण्याच्या बहाण्याने राजभवनात नेण्यात आले. तेथे जाईपर्यंत आम्हाला काय होणार याची कल्पनादेखील नव्हती. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेते तेथे दाखल झाले. यानंतर राज्यपालांनी तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला. याप्रसंगी आम्ही अस्वस्थ होतो. यानंतर आम्ही शरद पवार यांच्या निवासस्थानी गेलो. आपण आजवर राष्ट्रवादीसोबत असून भविष्यातही राहूच अशी ग्वाही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याप्रसंगी दिली. दरम्यान, बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांनीदेखील आपल्याला याच प्रकारे दिशाभूल करून राजभवन येथे नेण्यात आल्याची माहिती दिली. याशिवाय, अन्य काही सदस्यांनाही याच प्रकारे फसवण्यात आल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.
शरद पवार पुढे म्हणाले की, प्रत्येक पक्षाने आमदारांच्या स्वाक्षर्यांसह याद्या तयार केल्या होत्या. यात राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या पाठींब्याचे पत्र हे अजित पवार यांच्याकडे होत्या. मात्र या सह्या पाठींब्यासाठी नव्हे तर उपस्थितीसाठी होत्या. हे पत्र त्यांनी राज्यपालांकडे देऊन ५४ सदस्यांचा पाठींबा दर्शविण्यात आला असून ही दिशाभूल करण्यात आली आहे. राज्यपालांनी फडणवीस यांना बहुमत सिध्द करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली असून ते बहुमत सिध्द करू शकणार नसल्याचा दावा शरद पवार यांनी याप्रसंगी केला. यानंतर आमची आघाडीच पुन्हा सत्तारूढ होणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला. आम्ही एकत्र असून एकत्र राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.