मुंबई – रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टव्दारे आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. आज मृत्यूचंही राजकारण केलं जात असल्याचा एक नवीनच खेळ पहायला मिळतोय. मला वाटतं ही विकृती असून त्याला आपण थारा द्यायला नको, असे पवारांनी स्पष्ट केले.
रोहित पवार म्हणाले, वास्तविक आत्महत्या कोणाचीही असो ती व्हायलाच नको. मग त्यात शेतकरी असो, व्यावसायिक असो, गरीब असो, श्रीमंत असो किंवा सिनेसृष्टीतील कोणी असो. पण दुर्दैवाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रांत नैराश्याचे काळे ढग जमा झालेत, त्यामुळं आत्महत्येच्या घटना वाढत आहेत आणि याचं लोण चित्रपट क्षेत्रापर्यंत येऊन थडकलंय. चित्रपट क्षेत्र हे आपल्याला पडद्यावर दिसणाऱ्या फक्त तारे-तारकांपुरतं मर्यादित निश्चितच नाही. यामागे खूप मोठी साखळी आहे.
सेट उभारणी करणारे, कॅमेरामन, सहकलाकार, स्पॉट बॉय, डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, ड्राइव्हर, आचारी, व्हिडिओग्राफर, व्हिज्युअल आर्टिस्ट, सिनेमॅटोग्राफर, व्हिडिओ एडिटर, ग्राफिक्स डिझईनर, लाईट बॉय, पेंटर, हेअर ड्रेसर्स, कॉस्च्युम डिझाईनर, थिएटरमध्ये काम करणारे टेक्निकल व इतर कामगार असे अनेकजण यात आहेत आणि ही यादी आणखी खूप मोठी आहे. यापैकी सगळेच गर्भश्रीमंत आहेत असं नाही तर अनेकजण सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. अगदी ग्रामीण भागातून आलेल्यांचाही यात समावेश आहे. त्यामुळं या क्षेत्राकडं पाहण्याची आपली दृष्टीही बदलली पाहिजे आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजे. पण त्याऐवजी आज मृत्यूचंही राजकारण केलं जात असल्याचा एक नवीनच खेळ पहायला मिळतोय. मला वाटतं ही विकृती असून त्याला आपण थारा द्यायला नको, असे पवार म्हणाले.