जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळताना दिसत आहे. शिवसेना (शिंदे गट) २५ जागांवर, तर भारतीय जनता पक्ष ५० जागांवर लढणार असल्याचे निश्चित झाले असून, आम्ही त्याप्रमाणे तयारी पूर्ण केली आहे, अशी महत्त्वाची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.

नेत्यांच्या उपस्थितीत झाला होता निर्णय :
आमदार किशोर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “गेल्या चार ते पाच दिवसांपासून जळगाव महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्याबाबत सविस्तर चर्चा सुरू आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत ५० जागा भाजपला आणि २५ जागा शिवसेनेला देण्याचे ठरले होते. ही निवडणूक एकत्रित लढविण्याची आम्हा सर्वांची तीव्र इच्छा आहे.”

नंतर काय झाले माहित नाही, पण आम्ही तयार! :
जागावाटपाच्या प्रक्रियेत मागील दोन दिवसांत झालेल्या घडामोडींबाबत बोलताना ते म्हणाले की, “सुरुवातीच्या बैठकीत २५ जागांचे गणित ठरले होते, मात्र त्यानंतर वरिष्ठ पातळीवर किंवा प्रमुख घटक पक्षांमध्ये काय चर्चा झाली, याची मला सविस्तर माहिती नाही. परंतु, आमच्या वाट्याला येणाऱ्या २५ जागांसाठी शिवसेनेने पूर्ण तयारी केली असून, ठरल्याप्रमाणे आम्ही त्या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.”
महायुतीची वज्रमूठ कायम ठेवण्याचा प्रयत्न :
जळगाव महापालिकेत महायुतीची सत्ता आणण्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे मैदानात उतरणार असल्याचे किशोर पाटील यांच्या विधानाने स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात आता शिवसेनेने २५ जागांवर लक्ष केंद्रित केले असून, येत्या काही तासांत महायुतीचा अधिकृत संयुक्त उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. या विधानामुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला असून प्रचाराला गती मिळणार आहे.



