फत्तेपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘आम्ही बिहारचे सोनार आहोत, दागिने चमकवून देतो’ असे सांगून एका महिलेची ६० ग्रॅम चांदीची फसवणूक केल्याची घटना जामनेर तालुक्यातील जुनोन येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलिसांनी तीन आरोपींना तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता ताराचंद राठोड (वय ३४, रा. जुनोन, ता. जामनेर) या आपल्या घरासमोर असताना तीन अनोळखी इसम त्यांच्याकडे आले. “आम्ही बिहारचे सोनार आहोत, आमच्याकडे खास पावडर आणि ॲसिड आहे, ज्याने आम्ही जुने दागिने चमकवून देतो,” असे सांगून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला.

भामट्यांनी कविता राठोड यांच्या हातातील ४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ‘एल्या’ (बाजूबंद) स्वच्छ करून देण्याच्या बहाण्याने एका बादलीतील द्रावणात टाकले. काही वेळाने त्यांनी दागिने बाहेर काढून दिले. मात्र, संशय आल्याने महिलेने देऊळगाव गुजरी येथे जाऊन दागिन्यांचे वजन केले असता, त्यातील ६० ग्रॅम चांदी कमी झाल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास चक्रे फिरवली आणि रोहित कुमार मदन साह (वय २१), रोशन कुमार बबलु साह (वय २१) आणि बलराम कुमार सिकंदर साह (वय ३०, तिघे रा. भागलपूर, बिहार) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली अंदाजे १४ हजार रुपये किमतीची ६० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रवीण चौधरी करत आहेत.



