पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून, २६ गावांना २४ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ३२ गावांना पाणीपुरवठा करणारा खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्प अखेरची घटका मोजत असून, जेमतेम १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा तेथे शिल्लक आहे.
तालुक्यातील लासुरे- (१ टँकर १२ हजार लीटर) सावखेडा खुर्द व सावखेडा बुद्रूक -(१ टँकर दोन फेऱ्या २४ हजार लीटर), वाणेगाव – (१ टँकर १२ हजार लीटर), निंभोरी खुर्द व बुद्रूक -(१ टँकर २ फेऱ्या) राजुरी खुर्द बुद्रूक -( १ टँकर ३ फेऱ्या), शिंदाड -(२४ हजारांचे १ टँकर २ फेऱ्या व १२ हजाराचे ४ फेऱ्या), भोरटेक खुर्द (१२ हजार लीटर १ टँकर २ फेऱ्या), खाजोळा- १२ हजारांचे १ टँकर ३ फेऱ्या), वडगाव जोगे (१२ हजारांचे १ टँकर) शहापुरा–(१२ हजारांचे १ टँकर), लोहारा (२४ हजारांच्या २ टँकरच्या प्रत्येकी ३ फेऱ्या ), कासमपुरा (१२ हजाराचे २ टँकर्स प्रत्येकी २ फेऱ्या), वरखेडी (१२ हजारांचे २ टँकरच्या प्रत्येकी २ फेऱ्या), वडगाव कडे- १ टँकर ३ फेऱ्या) भोकरी (१ टँकर ३ फेऱ्या), टाकळी बुद्रूक (१ टँकर २ फेऱ्या), वाडी (१ टँकर २ फेऱ्या), शेवाळे (१ टँकर २ फेऱ्या), पिंप्री खुर्द प्र.पा. (१ टँकर २ फेऱ्या), सारवे बुद्रूक प्र.लो. (१ टँकर), भोजे (२ टँकर २ फेऱ्या),याप्रमाणे दररोज खडकडेवळा येथील हिवरा प्रकल्पातून २६ गावांसाठी टँकर्सने पाणी पुरवले जात आहे.
भोरटेक व खाजोळा गावांसाठी दिघी धरणातून पाणी उचलले जाते.दरम्यान, खडकदेवळा येथील हिवरा प्रकल्पच जेमतेम पाणीपुरवठा करीत असून धरणात मृत साठाच तेवढा शिल्लक आहे. त्यातही शेतकरी मृत साठ्यातच मोटारी टाकून पाण्याची सर्रास चोरी करीत असल्याचे चित्र आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना शेतीसाठी थेट पाण्यात मोटारी टाकून पाणी उचलले जात आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असून, पाणी चोरीला त्याची मदतच होत आहे. अद्याप पुरेसा पाऊस पडला नसल्याने कदाचित आणखी महिनाभर पाणीपुरवठा करण्याची गरज पडू शकते. आता मात्र जेमतेम १० दिवस पुरेल एवढाही साठा शिल्लक नाही. यामुळे टँकरने कुठून पाणीपुरवठा करावा, याविषयी तालुका प्रशासनास चिंता लागली आहे. पाटबंधारे विभागाने पाणीचोरी थांबवली तरच आणखी काही दिवस तहान भागेल, अन्यथा पाण्यावाचून तालुकावासीयांचे हाल होण्याची भीती व्यक्त होत आहे.