भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘अमृत योजने’ अंतर्गत पाणी टाकीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून गूढरीत्या ठप्प आहे. यामुळे शहरातील पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसत असून, या दिरंगाईविरोधात नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज भाजप नगरसेवकांनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात धडक देत मुख्याधिकाऱ्यांना अक्षरशः घेराव घातला आणि कामाच्या विलंबाबाबत जाब विचारला.
तीन महिन्यांपासून काम रामभरोसे :
केंद्र आणि राज्य शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून साकारली जाणारी अमृत योजना ही शहरासाठी जीवनवाहिनी आहे. मात्र, गेल्या ९० दिवसांपासून पाणी टाकीचे बांधकाम कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बंद ठेवण्यात आले आहे. “अमृत योजनेचे काम का थांबवले? या विलंबाला जबाबदार कोण?” असे प्रश्न उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासकीय कामकाजावर ताशेरे ओढले. स्पष्ट कारण नसताना काम थांबवल्याने यामागे काही राजकीय अडथळे किंवा प्रशासकीय अनास्था आहे का, असा संशयही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुख्याधिकाऱ्यांचा घेराव आणि इशारा :
भाजप नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने वॉटर सप्लाय कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जोरदार खडाजंगी झाली. “शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना, महत्त्वाचे प्रकल्प असे रखडून ठेवणे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा नगरसेवकांनी दिला. दोन दिवसांत कामासंदर्भात लेखी स्पष्टीकरण आणि काम पुन्हा सुरू करण्याचा ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
प्रशासनाची भूमिका :
नगरसेवकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेतली. “काही तांत्रिक अडचणींमुळे कामात खंड पडला असू शकतो. मी स्वतः या प्रकरणाची फाईल तपासून येत्या दोन दिवसांत संपूर्ण माहिती देऊन योग्य तो निर्णय घेईन,” असे आश्वासन त्यांनी दिले. आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या दोन दिवसांनंतरच्या भूमिकेकडे लागले असून, भुसावळकरांना पाणी कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे.



