Home प्रशासन नगरपालिका फैजपूरमध्ये पाणीटंचाईचा स्फोट ; संतप्त नागरिकांचा पालिकेवर मोर्चा 

फैजपूरमध्ये पाणीटंचाईचा स्फोट ; संतप्त नागरिकांचा पालिकेवर मोर्चा 


फैजपूरलाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ऐतिहासिक फैजपूर शहरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून, संतप्त नागरिकांनी थेट नगरपालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. मात्र, नागरिकांच्या या आक्रमक भूमिकेदरम्यान मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने संताप अधिकच वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

फैजपूर नगरपालिकेत सत्ता स्थापन होऊन पाच महिने उलटूनही पाणीपुरवठ्याचे कोणतेही ठोस नियोजन नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रावेर विधानसभेतील फैजपूर आणि रावेर नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असूनही मूलभूत सुविधांबाबत नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने नाराजी वाढत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुखी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नियोजनाच्या अभावामुळे पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी अवस्था शहरवासीयांची झाली असून, सध्या चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यावल रोडवरील जानकी नगर आणि साने गुरुजी नगर येथील रहिवाशांनी एकत्र येत पालिकेत धडक दिली.

नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दालनात गर्दी केली होती. मात्र, मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली. अखेर ते न आल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

निवडणुकीपूर्वी प्रशासकीय राजवटीत दर दोन दिवसांनी पाणीपुरवठा होत होता. मात्र, निवडणुकीनंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली असून, आता पाच दिवसांनी पाणी मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. धरणात पुरेसा साठा असतानाही केवळ नियोजनाअभावी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

जानकी नगर आणि साने गुरुजी नगर परिसरातील महिला व पुरुषांनी पालिकेचे अधीक्षक हेमंत ठाकरे यांच्यासमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीपुरवठ्याची ही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या समस्येबाबत गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भागात कमी व्यासाच्या पाइपलाईनमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पाइपलाईन बदलण्याचा प्रस्ताव असून, पाणीपुरवठा विभागात कायमस्वरूपी अभियंता नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. तरीही या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

फैजपूर शहरातील ही परिस्थिती प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे उदाहरण असल्याचे नागरिकांचे मत असून, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी वाढत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound