अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ९० गावांमध्ये सध्या पाणी टंचाई आहे, त्या पैकी ४७ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मुडी, बोदर्डे, कळंबु, भिलाली, एकलहरे, येथुन पांझरा नदी पत्रातून पाण्याचे टँकर भरले जात आहेत. मात्र नदी आटल्याने विहिरींची पाणी पातळी खोल गेली असून लवकरच त्या विहिरीही आटण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तालुक्यातील आणखी ४० गावांमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातुन पांझरा नदीत आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
या गावांच्या ग्रामपंचायत विहिरी, बोरवेल, यामधुन टँकरद्वारे २५ ते ३० गावांना पाणी पुरवठा केला जात असल्याने आणि या विहिरी पांझरा नदी काठी असल्याने नदीत पाणी आटल्यावर या विहिरींची पातळी खोल गेली आहे. येथील बीडिओ संदिप वायाळ यांनी स्व:ता विहिरींची पाहणी केली असता विहिरी खोल गेल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, असे वायाळ यांचे म्हणणे आहे. तसेच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अक्कलपाडा धरणातुन पांझरा नदीत आवर्तन सोडण्यात यावे, अशी विंनती केली आहे, तसेज मुडीचे सरपंच काशिनाथ पाटिल व बोदर्डेचे सरपंच संतोष चौधरी, कळंबुचे सरपंचं व सौ. लताबाई राजपुत यांनी त्यांच्या खाजगी बोरवेल मधुन टँकरने पाणी पुरवठा करण्यात मदत सुरु केली आहे, असे बीडिओ वायाळ यांनी स्पष्ट केले आहे.