यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणा गावामध्ये पाणी प्रश्न गंभीर होत आहे. शासनाने राबवलेल्या सर्वच्या सर्व उपाययोजना येथे कुचकामी ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे डोंगर हळा परीसरात असलेल्या विहिरीवरील स्टॅण्ड पोस्टला नळ तोट्या नसल्याने ऐन टंचाईत पाण्याची नासाडी होत आहे.
गावातील दुकानदार सुनिल चौधरी यांनी तात्पुरत्या स्वरुपात त्या नळांना ट्युब बांधून पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी भुपेंद्र झोपे यांनी स्वखर्चाने स्वतःच्या ट्रॅक्टरने आपल्या शेतातील विहिरीवरून पाणी आणून गावात काही वार्डात मोफत जलसेवा पुरवली आहे. त्यांचा आदर्श इतरांनीही घेण्याची गरज आहे. डोंगर हळा परीसरातील कुडाला बसवण्यात आलेली पाईप लाईन आणि गुरांसाठी असलेले कुंडही फुटलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत आहे. ग्रामपंचायतिने यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.