Home Cities धरणगाव ‘जलसंकल्प धरणगावचा’ अभियानाला प्रारंभ  

‘जलसंकल्प धरणगावचा’ अभियानाला प्रारंभ  


पाळधी -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील दुष्काळ आणि पुराच्या दुश्चक्रावर मात करण्यासाठी ‘जलसंकल्प धरणगावचा : पाणी अडवा–पाणी जिरवा, शेती समृद्ध करा’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन करत “नाला खोलीकरण म्हणजे शेतीच्या भविष्यासाठीचा विमा” असे प्रतिपादन केले.

महाराष्ट्र भूषण जेष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून पाळधी–चांदसर जिल्हा परिषद गट (टप्पा क्र. १) अंतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लाडली येथील फार्म हाऊस परिसरात आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात या प्रकल्पाचा शुभारंभ झाला.

या वेळी अशोक जैन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, इंफ्राचे संचालक आश्विन अग्रवाल व सर्व्हे टीम प्रमुख अरुण घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे ६०० हून अधिक शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गुलाबराव पाटील म्हणाले की, “आज मी पालकमंत्री म्हणून नाही तर शेतकरी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. पाणी म्हणजे शेतकऱ्याचं जीवन आहे.” धरणगाव तालुका पावसावर अवलंबून असून अनियमित पावसामुळे पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. नदीपात्र व नाल्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे पाण्याची साठवण क्षमता घटली आहे. या अभियानातून साचलेला गाळ काढून तो शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात येणार असून त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढेल आणि भूजल पातळीत सुधारणा होईल. बांभोरी आणि कानळदा येथे बंधाऱ्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पांतर्गत तालुक्यातील सुमारे २१० किलोमीटर लांबीच्या नाले व नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे. काठांचे बळकटीकरण, विद्यमान बंधारे व के.टी. वेअर दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार नवीन बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या कामामुळे खरीप व रब्बी हंगामासाठी शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील अनेक भाग ‘डार्क झोन’मध्ये जात आहेत. भविष्यात बोअरवेल परवानगी कठीण होऊ शकते. त्यामुळे जलसंधारणाच्या उपक्रमांना शेतकऱ्यांनी सक्रिय पाठिंबा द्यावा. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अशोक जैन यांनी सांगितले की, पाणी अडवून जमिनीत जिरवल्यास शेती आणि शेतकरी दोघेही समृद्ध होतात. कांदाई बंधाऱ्यामुळे परिसरातील पाच किलोमीटरपर्यंत पाण्याची उपलब्धता वाढली असून बागायती शेतीला चालना मिळाली आहे. बांभोरी आणि कानळदा येथे बंधारे उभारल्यास गिरणा नदीकाठच्या सुमारे ४० गावांना लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात सुप्रसिद्ध शाहीर संग्राम जोशी आणि संदीप जोशी यांनी “पाणी अडवा–पाणी जिरवा” अभियानावर बहारदार पोवाडे सादर करून वातावरण रंगवले. “धरणगावचा जलसंकल्प – समृद्धीकडे वाटचाल” या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांचा रुमाल, टोपी आणि रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले, सूत्रसंचालन तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound