खेड (वृत्तसंस्था) रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेल्याने हा महामार्ग बंद ठेवण्यात आला असून त्यावर सुरक्षारक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सह्याद्री खोऱ्यातील 32 गावात मुसळधार पाऊस सुरू असून त्यांचा जनसंपर्क तुटल्याचे समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून तिथली वाहतूक वळविण्यात आली आहे. या मुसळधार पावसामुळे चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी आले आहे. चिंचघरी येथे रस्त्यावर पाणी आल्याने सती अडरे अनारी रस्ता बंद आहे. तसेच कान्हे पुलावरुन देखील पाणी जात आहे. चिपळूण-गुहागर बायपास मार्गावर देखील पाणी साचले आहे. दरम्यान वाशिष्ठी पुलावरील वाहतूक अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकरांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. खेडपाठोपाठ मंडणगड, दापोली, देवरूख, साखरपा, लांजा, राजापूरमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अंतर्गत वाहतूक सुद्धा कोलमडली आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, दापोली मार्गही बंद करण्यात आला असून खेडच्या बाजारपेठेत आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.