‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व समजावून देणे व जल व्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविणे या उद्देशाने जलसंपदा विभागाच्यावतीने ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा करण्यात येणार असून, या उपक्रमाचा भव्य शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील मंत्रीमंडळ सभागृहात संपन्न झाला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “पाणी ही अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संपत्ती आहे. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून जनतेमध्ये पाण्याच्या सुयोग्य वापरासंबंधीची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. जल व्यवस्थापनासाठी केवळ शासनाचे प्रयत्न पुरेसे नाहीत, तर सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा.”

जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 15 ते 30 एप्रिल या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. यामध्ये जलसंवर्धन, जलशुद्धीकरण, कालवा स्वच्छता, पाणी दर वसुली, शेतकऱ्यांशी संवाद, महिला मेळावे, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण, आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा गौरव इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या पंधरवड्यात जलसंपदा आणि कृषी विभाग संयुक्त बैठका व कार्यशाळा घेऊन पाण्याचे नियोजन, पीक पद्धतीबदल, व उत्पादनवाढीच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करतील. तसेच ई-ऑफिस प्रणाली आणि सिंचन ई-प्रणालीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून जल व्यवस्थापनात पारदर्शकता आणली जाणार आहे.

जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “पंधरवड्यादरम्यान प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट विषय देण्यात आला असून त्यानुसार राज्यभरात विविध उपक्रम राबविले जातील. जिल्हा स्तरावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यशाळा आणि महिला मेळावे घेतले जातील. तसेच अपवादात्मक कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा दिली जाईल.” या पंधरवड्याच्या माध्यमातून राज्य सरकारने ‘पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा’ ही भावना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवण्याचा निर्धार केला आहे. हा उपक्रम फक्त शासनापुरता न राहता जनतेचा उपक्रम बनावा, ही अपेक्षा व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.

Protected Content