जळगाव, प्रतिनिधी | वॉटर ग्रेसच्या कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यापासून पगार नसल्याने ते आज पुन्हा महापालिकेत दाखल झाले होते. परतू, ते ठेकेदाराकडे काम करीत असल्याने पगार देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही ठेकेदाराची असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यानंतर त्यांनी ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शहर पोलीस स्टेशन गाठले.
मागील तीन महिन्यापासून वॉटर ग्रेसच्या कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने त्यांनी रोष व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी आज अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे अजय घेंगट यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्थायी सभापती अॅड. शुचिता हाडा यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी देखील असमर्थता दाखवली. यानंतर हे सफाई कर्मचारी थेट शहर पोलिसात गेले. वॉटर ग्रेस कंपनीने सर्व अटी शर्थीचा भंग केला असून त्यांनी किमान वेतन प्रमाणे जे पैसे दिले पाहिजे होते ते देखील आजपर्यंत दिलेले नाही असा आरोप अजय घेंगट यांनी केला. आयुक्ताकडे याबाबत तक्रार केलेली आहे. यावर आयुक्त यांनी सांगितले की, तुम्ही कायम नसून मक्त्यातील कर्मचारी आहात. तुम्ही रीतसर या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करा त्यांनी सुचविल्याप्रमाणे आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलो आहोत असे घेंगट यांनी सांगितले.