पाहिल्याच पावसात नव्या बजरंग बोगद्यात पाणीच पाणी (व्हिडीओ)

3c98740e 7b9a 49c6 b415 a5ad0786fddd

जळगाव (प्रतिनिधी) शहरात रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे नव्या विस्तारित बजरंग बोगद्यात पाण्याचे तळे साचल्याने सकाळी कामांवर जाणाऱ्या नागरिकांना तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलीच कसरत करीत तो पार करावा लागला.

 

पिंप्राळा परिसर, खोटे नगर परिसर तसेच शिवाजी नगर उड्डाण पूल पाडण्यात आल्याने सुरत रेल्वे गेटने जळगाव शेजारील गावातील रहिवासी या बोगद्यातून ये-जा करत असतात. विस्तारित बोगदा हा मागील वर्षीच रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या डबर कामावर कमी कुशन व कॉक्रिटीकरणावर जास्त कुशन असल्याने ही समस्या उदभवली असल्याचे जाणकारांचे मत आहे. जुन्या बजरंग बोगद्यातून रहदारीस अडचण होत असल्याने नवा विस्तारित बोगदा तयार करण्यात आला परंतु या विस्तारित बोगद्याने नागरिकांच्या अडचणीत भरच पडली आहे.

विस्तारित बोगद्यात पाणी साचल्याने दुचाकीस्वार, रिक्षा चालक, चारचाकी वाहन धारकांसह सायकलीवर शाळेत जाणारे विद्यार्थी यांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागला तर एक रिक्षा बोगद्यातच बंद पडल्याने तिला ढकलून बाहेर काढण्यात आले. या पाणी साचलेल्या बोगद्यातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत इच्छापूर्ती गणेश मंदिरा लगत असलेल्या महापालिकेच्या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने नागरिकांना त्या पाण्यात कसरत करत मार्ग काढावा लागला. काही दुचाकीस्वार महिलांनी बोगद्यातील पाणी पाहून भोईटे नगर गेटद्वारे शहरात प्रवेश करणेच पसंत केले. दरम्यान, या बोगद्यासमोरील गटारीचे काम महापालिकेतर्फे करण्यात येत असून या कामासाठी आणलेले जेसीबी रस्त्यातच उभे करण्यात आल्याने रहदारीस आणखी अडथळा निर्माण होत आहे.

 

Protected Content