जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरातील गटारींचा अभाव आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या समस्येकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महानगरपालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. मनसेने या दोन्ही समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत, अन्यथा १० दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मनसेने महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हरीविठ्ठल नगर परिसरात काही ठिकाणी काँक्रीट रस्त्यांची कामे झाली असली, तरी गटारींचे काम मात्र झालेले नाही. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर आणि घरांवर पडणारे पाणी वाहून न जाता थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे, ज्यामुळे आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मनसेने तात्काळ गटारींचे काम सुरू करून पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे, हरीविठ्ठल नगर हा वेगाने विस्तारणारा आणि मोठी लोकवस्ती असलेला परिसर असूनही येथे सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध नाही. विशेषतः हरीविठ्ठल नगर रिक्षा स्टॉप परिसरात बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महिलांसाठी ही परिस्थिती अत्यंत अडचणीची आणि असुरक्षित असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे, सदर ठिकाणी तात्काळ मोबाईल टॉयलेट आणि सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याची मागणी मनसेने केली आहे.
या दोन्ही समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असून, त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मनसेने म्हटले आहे. महानगरपालिका आयुक्तांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन येत्या १० दिवसांच्या आत कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे. अन्यथा, स्थानिक नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शैलीने महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
निवेदन देतेवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, ॲड. सागर शिंपी, संजय मोती, तसेच हरीविठ्ठल नगर येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



