मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करायची आहे, तडजोड नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्याचे वृत्त आहे. त्यानुसार भाजपने तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला असून युतीचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने विरोधकांचा धुव्वा उडवला. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी चाचपणीही सुरु झाली आहे. त्यामुळे हा वाद ताणला जाऊन ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तुटण्याची शक्यता आहे.
भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. पण युती तुटून स्वबळावर लढल्यास भाजपला १६० जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तडजोड न करण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतली असल्याचे कळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना हेच बजावले असल्याचे कळते. युती झाल्यास भाजपने या निवडणुकीत लढविलेल्या जागांपैकी ८० टक्के जागा जिंकून आणण्याची तयारी सुरू केली आहे.