
सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी | येथील ग्रामीण रूग्णालयाला राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आधीपासून असलेले नाव देण्यासाठी गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लाक्षणीक उपोषणानंतर देखील अद्यापही हे नाव देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे दोन्ही आमदारांनी आश्वासन देऊन देखील ही कार्यवाही न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. किमान आज शिवजयंतीच्या दिवशी तरी याला गती मिळावी ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, सावदा येथील नगरपालिकेच्या रूग्णालयास १९९९ साली राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले होते. यानंतर याला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला. याप्रसंगी म्हणजेच २०१० साली हॉस्पीटलला आधीचेच म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे असा ठराव संमत करून याला वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले. यानंतर तब्बल पंधरा वर्षे उलटून देखील काहीही कार्यवाही न झाल्यामुळे चर्चेला उधाण आले.
याला विरोध दर्शवत तात्काळ कार्यवाही करावी या मागणीसाठी गेल्या वर्षी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांनी लाक्षणीक उपोषण केले होते. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक आणि प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे नामकरण होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तर प्रशासनाने नवीन जीआरच्या खाली नामकरण करण्यास टाळाटाळ केली असली तरी नगरपालिकेचा ठराव आणि विशेष बाब म्हणून नामकरण सहजशक्य असल्याचे नमूद करत आंदोलकांनी ठाण मांडले.
या आंदोलनास मुक्ताईनरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी भेट दिली. याप्रसंगी आंदोलकांनी प्रशासनाच्या आडमुठेपणाबाबत संताप व्यक्त केला. दोन्ही आमदारांनी याची दखल घेऊन संबंधितांशी बोलणे केले. यात सावदा ग्रामीण रूग्णालयाला राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दोन्ही आमदारांनी दिले. यामुळे युतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले उपोषण सोडले होते.
दरम्यान, नगरपालिकेने ठराम संमत करून सोळा वर्षे तर युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपोषणाला एक वर्ष उलटून गेल्यानंतर देखील सावदा येथील ग्रामीण रूग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची प्रतिक्षा असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही आमदारांनी आता लवकरात लवकर या प्रकरणी पाठपुरावा करून नामकरण करावे अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त होत आहे.



