पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) । वाचनाने माणुस सुसंस्कृत बनतो असे प्रतिपादन मुख्याध्यापक पी.टी. पाटील यांनी संतोषी मातानगर येथील जि.प. प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षिय भाषण करताना बोलत होते.
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांसमोर पुढे बोलतांना पी.टी. पाटील यांनी सांगितले की, वाचनाने माणुस खुप मोठा होतो. वाचन केल्याने बौद्धिक क्षमतेत वाढ होते. ज्ञान प्राप्त होते. वाचनाने चार चौघात चालु घडामोडींवर चर्चा करता येते. वाचनाने माणसाला पुढची दिशा कळते. ज्याचे वाचन चांगले त्याचे भाषणावर प्रभुत्व अधिक चांगले असते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.टी. पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक यमुनाबाई पांढरे, निसरीन शेख इरफान, शाहिस्ता वसीम सैय्यद हे उपस्थित होते. यावेळी “जागतिक हात धुवा दिन” सुद्धा साजरा करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक पी. टी. पाटील यांनी हात कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. “वाचन प्रेरणा दिन” निमित्त इ.१ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा तसेच तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वाचनाचे महत्व’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मनिषा राऊत यांनी केले व सूत्रसंचलन रोहिणी शिंदे यांनी केले व आभार रत्नमाला कासार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चित्रलेखा राजपूत, सुवर्णा मोरे यांनी परिश्रम घेतले.