मुंबई-वृत्तसेवा | राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 7) मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेच्या 731 जागा आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी लढत होत असून एकूण 7,438 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यभरात 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम 13 जानेवारी 2026 रोजी जाहीर केला होता. सुरुवातीला 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे मतदानाची तारीख बदलून आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकांची मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार असून त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

या निवडणुकांसाठी जिल्हा परिषदांच्या 731 जागांपैकी 369 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी 25 आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 191 जागा आरक्षित आहेत. या सर्व जागांसाठी 2,624 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पंचायत समित्यांच्या 1,462 जागांपैकी 731 जागा महिलांसाठी राखीव असून अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी 38 आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी 342 जागा आरक्षित आहेत. या जागांसाठी 4,814 उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला आणि 468 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी 25,471 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी सुमारे 1 लाख 28 हजार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार असून 51,537 कंट्रोल युनिट आणि 1,10,329 बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी होत असल्याने प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. जिल्हा परिषदेसाठी पांढऱ्या रंगाची तर पंचायत समितीसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे.
मतदारांना आपले नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप तसेच mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. त्याद्वारे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक टाकून माहिती मिळू शकते.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला आणि तान्ह्या बाळांसह येणाऱ्या महिलांसाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, विजेची सोय, सावली आणि शौचालयाची व्यवस्था मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. या निवडणुका गाव आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वाच्या असल्याने सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.



