जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक ११ मध्ये मतदान प्रक्रियेला उत्साही वातावरणात सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी दिसून येत असून लोकशाहीच्या या उत्सवात मतदार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

शिवसेना (शिंदे गट) यांच्या अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी गुरुवारी १५ जानेवारी रोजी सकाळी ठीक ९ वाजता रामानंदनगर येथील विवेकानंद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान करत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.

मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिंधुताई कोल्हे यांनी मतदारांना आवाहन केले. त्या म्हणाल्या की, “लोकशाही हा भारताचा आत्मा आहे. ही लोकशाही अधिक प्रबळ आणि बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. घराबाहेर पडून शांततेत आणि उत्साहात मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.”
प्रभाग क्रमांक ११ मधील सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधला होता. त्याचा परिणाम म्हणून सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
विशेषतः महिला मतदार आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मतदानाबाबत मोठा उत्साह दिसून आला. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडत असून प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.



