नवी दिल्ली वृत्तसंस्था । लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सहाव्या टप्प्यासाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झाले असून यात अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.
लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात ५९ जागांसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. यात दिल्लीतील सर्वच्या सर्व म्हणजे सात जागांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होत आहे. १०.१७ कोटी मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यात अनेक मान्यवरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भोपाळ येथील दिग्वीजयसिंग आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यातील सामन्याकडे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. २०१४ साली यातल्या ५९ पैकी तब्बल ४५ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. हीच कामगिरी कायम राखण्याचे कठीण आव्हान या पक्षासमोर आहे.