भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासूनच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मंत्री संजय सावकारे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला.
मंत्री संजय सावकारे यांनी त्यांच्या पत्नी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांच्यासह भुसावळ येथील संत गाडगेबाबा कन्या महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भुसावळकरांना मोठ्या संख्येने बाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

भुसावळ शहरात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. विशेषत: महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय होता. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी भुसावळकर उत्साहाने मतदान करत असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट आणि अत्यंत चुरशीची लढत होत आहे. विद्यमान मंत्री संजय सावकारे यांची पत्नी रजनी सावकारे या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली असून, भुसावळचा नवा चेहरा कोण असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा निकाल भुसावळच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.



