जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज ब्युरो | जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झाले असून यात नेमका कुणाला कौल मिळणार हे मतदारराजाच ठरविणार आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिताताई उदय वाघ यांना शिवसेना-उबाठा पक्षाचे नेते करण बाळासाहेब पाटील-पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. तर रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांच्या समोर राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने आव्हान उभे केले आहे. तर येथूनच वंचित बहुजन आघाडीने अभियंता संजय पंडित ब्राह्मणे यांनी देखील आव्हान उभे केले आहे.
दरम्यान, आज सकाळी सात वाजेपासून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरू झाले आहे. मतदान करतांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने अतिशय जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मतदारांना पुर्णपणे सुविधा पुरविण्यात आल्या असून हेल्पलाईन देखील कार्यरत करण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन प्रशासन, मान्यवर आदींसह लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे.