
वर्धा (वृत्तसंस्था) आज महाराष्ट्रामधील निवडणूक प्रचाराला वर्ध्यातील सभेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. या राज्यातील पहिल्याच सभेमध्ये त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न केला. मोदींनी सकाळीच मराठीमध्ये ट्विट करुन या सभेसंदर्भात माहिती दिली होती. मात्र, मोदींच्या या सभेला अपेक्षेप्रमाणे गर्दी पहायला मिळाली नाही. सभेला अपेक्षेहून खूपच कमी गर्दी झाल्याने सभेचे बरेसे मैदान रिकामेच दिसत होते.
मागील २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्ध्यातच घेण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. वर्धा भाजपसाठी लकी ठरत असल्याने या वेळी राज्यातील प्रचाराचा शुभारंभ देखील वर्ध्यातच करण्यात आला. आज सकाळी साडे अकरा वाजता वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात मोदींची या वर्षीच्या निवडणूक प्रचारातील पहिली जाहीर सभा झाली. मात्र १८ एकरच्या या मैदानाचा अर्ध्याहून अधिक भाग रिकामाच होता. उन्हाळा आणि सभेच्या ठिकाणी मंडप नसल्याने अनेकांनी सभेकडे पाठ फिरवल्याचीही चर्चा आहे. या आधी २८ मार्च रोजी मोदींनी लोकसभा निवडणुकींसाठीचे रणशींग मेरठ येथील सभेमधून फुंकले त्यासभेतही मागील बाजूला खुर्च्या रिकाम्या असणारे फोटो व्हायरल झाले होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी हिंदुत्वाच्या मुद्दावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने हिंदू दहशतवाद हा शब्द वापरुन देशाचा अवमान केला आहे. जगामध्ये हिंदू दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असण्याची एकही घटना नाहीय. हिंदू दहशतवाद हा शब्द आणून काँग्रेसने देशाची पाच हजार वर्षापेक्षा जुनी संस्कृती बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. दरम्यान मोदी राज्यात आठ सभा घेणार असून त्याची सुरुवात आजच्या वर्ध्या येथील सभेपासून झाली तर मोदींची शेवटची सभा ही मुंबईत होणार आहे. आजच्या सभेला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रचार संयोजक सुधीर दिवे, अध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, मित्रपक्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे उपस्थित होते.
या सभेमध्ये मोदी मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावरुन भाषण करणार आहेत. राज्यात होणाऱ्या सभांसाठी केंद्रीय मंत्री मंडळामधील सुषमा स्वराज, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच अमित शाह आणि भाजपाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तरी पंतप्रधानांच्या पहिल्याच सभेतील रिकाम्या मैदानामुळे आयोजकांच्या चिंतेत नक्कीच भर पडली आहे.
खोटी बातमी आणि खोटा फोटो …सभा संपल्यावर घेतलेला फोटो आहे हा ….मैदान पूर्ण फुल्ल होत सभेला